शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….
सा विद्या या विमुक्तये
“सा विद्या या विमुक्तये” हा सुविचार आपण वाचला आहे. जी मुक्ती देते, बंधनातून सोडवते तीच विद्या. संस्कृतमधे विद् म्हणजे जाणणे. जिच्या मुळे जाणता येतं तिला विद्या म्हणायचं. वाचन ही अशी विद्या आहे.
जे पूर्वी माहिती नव्हतं ते वाचलं की माहिती होतं. माहितीचं रूपांतर हळूहळू ज्ञानात होतं. आणि अज्ञानाच्या बंधनातून वाचन आपल्याला मुक्त करतं. जे माहिती होतं ते वाचलं तर ते वाचन आपल्याला पुनरानुभवाचा आनंद देतंच. पण पुन्हा विचार केल्यावर या माहितीचा पडताळाही पहाता येतो. अनेकदा पूर्वीच्या वाचनात समजलेला अर्थ नव्या वाचनात पूर्णपणे बदलेला मी अनुभवला आहे.
आपण आपल्यावरच अनेक बंधनं घालत असतो. पूर्वग्रह हे असंच एक बंधन. कालच्या माझ्या पूर्वग्रहाशी विसंगत असं लेखन आज आपल्या वाचनात आलं तर आपण ते पटकन् स्वीकारत नाही. “एकच गोष्ट बदलत नाही ती म्हणजे बदल”. हे आपण लक्षात ठेवलं तर नवं वाचन आपल्याला अंतर्मुख नक्कीच करतं. नवा विचार स्वीकारायचा का नाकारायचा, हे त्याबद्दल नवीन वाचल्यावर ठरवायचं हा नियम आपली शक्ती बनतो. सर्वच क्रांतिकारी शोध, विचार अनेकांचे पूर्वग्रह नाकारतच जन्माला आले आहेत. अशा विचारांना जन्माला घालणारी आई म्हणून वाचनाचा उल्लेख करावा लागेल.
एका लेखनाचा एकच अर्थ लावायचा हे बंधनही वाचन झुगारून देतं. साहित्य समीक्षेत एक संकल्पना आहे. लेखकाची साहित्यकृती पूर्ण झाली, की लेखक मरतो आणि वाचक जन्माला येतो. वाचक त्यांच्या चष्म्यातून हीच कृती वाचतात. तिचा नवा अर्थ वाचकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. हा नवा आस्वाद नव्या विचारांची निर्मिती करू शकतो. एक सुंदर उदाहरण यासाठी दिले जाते. आकाशात चंद्र एकच आहे पण प्रत्येक तलावात त्याचे प्रतिबिंब मात्र वेगळे पडते.
वाचन हेच एक बंधन बनू शकते. अनेकदा इतरांनी लिहिलेलं वाचून त्याप्रमाणे आपले विचार आणि कृती करणारे मोठ्या प्रमाणात आहेत. इतरांचे अनुभव आणि विचार वाचायचे पण तपासूनच अमलात आणायचे असं ठरवलं तर नव्याने निर्माण होणारी कॉपी पेस्ट संस्कृती फोफावणार नाही.