UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


साक्षर

संस्कृतात “वचने किम् दरिद्रता” असे वाक्य आहे. निदान,बोलण्यात कंजूषी कशाला करायची ? असा त्याचा थोडक्यात अर्थ. वचने या शब्दात थोडासा (एका कान्ह्याचा) फरक करून वाचायला काय हरकत आहे ? (किंवा “वाचन करण्यात कसली कंजूषी?”)

मी साक्षर झालो बहुधा पाचव्या वर्षी. अंकलिपी मराठीतूनच होती. अ-अननस, आ-आई, इ-इमारत,ई-ईडलिंबू ही माझी वाचन क्षेत्रातली पहिली पाउले. त्यानंतर आई वडिलांबरोबर रस्त्यावर चालताना दुकानांच्या पाट्या वाचणे हा एक महत्वाचा उद्योगच झालेला मला आठवतो.

त्यानंतर आत्ता पर्यंत पुस्तकांनी माझी आणि मी पुस्तकांची साथ सोडली नाही. वाचता वाचता लिहायलाही लागलो. शाळेत निबंध लिहिले. कॉलेजात लिहिलेल्या कविता, निबंध, गोष्टी, केलेल्या भाषणांचे मसुदे हे थोडंसं लेखन. जगाची ओळख पुस्तकांमधूनच झाली. म्हणूनच वाचनावरची ही लेखमाला.

टी व्ही, मोबाइल आणि व्हिडिओच्या जगात वाचन लुप्त होईल असं इतरांना वाटत असताना मी या मुरलेल्या (वाचन)कलेबद्दल निश्चिंत आहे. पण भारतात साक्षरताच कमी. त्यातून सही करता आली म्हणजे माणूस साक्षर झाला अशी साक्षरतेची व्याख्या. त्यामुळे या पारंपारिक कलेच्या वारशाचा प्रसार करावा लागेल असे वाटते.

वाचन करण्याची संस्कृती जोपासणे आज गरजेचे होऊन बसले आहे. माझे या बाबतचे विचार आणि कृती वाचाल तर वाचाल या लेखमालिकेत मी व्यक्त करणार आहे. माझ्या या वाचन यात्रेत सामील झाल्या बद्दल आभार.


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-20 Mon 07:38