UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


साधे जीवन

दोन पुस्तके़ या माझ्या लेखात मी श्री. दिलीप कुलकर्णी यांच्या दोन पुस्तकांबद्दल लिहिलं आहे. ऊर्जेच्या वापराचा अतिरेक आणि विकासाचा भ्रमाचा भोपळा अशा दोन गोष्टींबद्दल त्यांचे विचार या पुस्तकांत आहेत.

आपल्या कोकणात जसे दिलीप कुलकर्णी जगताहेत तसेच ऑस्ट्रेलियात सॅम्युअल अलेक्झांडर आणि टेड ट्रेनर. त्यांचे विचार आणि जीवनपद्धती मराठीत वाचण्यासाठी उपलब्ध व्हावी म्हणून त्या दोघांच्या एका पुस्तिकेचं मराठी भाषांतर मी केलं आहे.

“साधे जीवन” ही पुस्तिका वाचल्यावर तुमच्या मनात अनेक विचार निर्माण होतील. ते व्हावेत हाच ती पुस्तिका भाषांतरित करून तुमच्यापुढे मांडण्यामागचा उद्देश आहे.

  • आपले ऋषी मुनी असेच तर जगत होते. मग या पुस्तिकेत नवं असं काय आहे ?
  • अहो वर्तमानात जगा, बैलगाडीच्या युगात आता परत का जाता ?
  • ही कम्युनिस्ट विचारसरणी आहे. दूर राहा यांच्या पासून .
  • सगळं कसं मस्त चाल्लंय्. कशाला आता आदिमानवासारखं जगायचं ?
  • हे परदेशातल्या लोकांसाठी ठीक आहे तेच पूर्वीपासून चंगळ करताहेत. आम्हाला मस्त,चांगलं जगू द्या की जरा.
  • इस्रायल मधे किबुट् होतेच की. अजूनही असतील. तसंच आहे हे सगळं.
  • फार आदर्शवादी आहे हे सगळं. असं कधी करता येणार नाही प्रत्यक्षात.

असे विचार आपल्या मनात आले तर त्याचा अर्थ एकच . ते करण्याची अापल्यात हिम्मत नाहीये, आपण सबबी शोधतो आहोत, असा. “साधे जीवन” या मार्गानं जाण्यासाठी आपण एकेक पाऊल टाकायला सुरुवात केली तरच पुढच्या पिढ्यांसाठी आपण काहीतरी करतोय असं म्हणता येईल.

पण, ” हे करून पहाण्यासारखं आहे. एक पाऊल टाकून पाहूया ” असा विचार मनात आला, तर मग तुम्ही आमच्या बिरादरीत सामील झालात ! चला एकेक पाऊल टाकत सगळे मिळून पुढे जाऊया.

मी या पुस्तकाचं भाषांतर करण्याचं कारण, मला त्यात आजच्या अनेक अडचणींवरचे उपाय सापडले. असं जाणवलं की काही वर्षांपूर्वी (हे सारं न वाचता) मी पावलं टाकायला सुरुवात केली होती (सायकलस्वारी) या साध्या जीवनाचे फायदे मी काही प्रमाणात अनुभवले आहेत. अनेकांना असं साधं जीवन स्वीकारण्याची इच्छा आहे. पण नेमकं काय करायचं हे समजत नाही. अशांसाठी या पुस्तिकेत एक कृती-आराखडाच सुचवला आहे. या सगळ्या गोष्टी करण्याच्या आहेत फक्त बोलण्याच्या, वाचण्याच्या नव्हेत. ज्यांना इंग्रजी वाचनाची इच्छा किंवा आवड नाही त्यांच्यासाठी हे भाषांतर आहे.

राज्यकर्ते बदलले, कायदे कडक झाले, तंत्रज्ञान अत्याधुनिक झालं, संपर्क सुलभ झाला तरी ताण तणाव, कष्ट, काळज्या, कमी का झाल्या नाहीत ? फक्त पहारेकरी बदलले तुरुंग तोच राहिला असं का वाटलं ? आम्ही पराकोटीचे परावलंबी झालो म्हणून.

अन्न, वस्त्र आणि निवारा या बाबतीत व्यक्ती-व्यक्तीला स्वावलंबी कसं होता येईल आणि त्याचं फळ सगळ्या समुदायाला कसं मिळेल, या बद्दल ही पुस्तिका आहे. तणावहीन आयुष्य शक्य आहे पण ते जगण्याची धमक आपल्यात हवी. त्यासाठी माणसांच्या मेंढ्या करणारी प्रक्रिया नाकारता यायला हवी. नाहीतर खाटिकखाना हेच आपलं गंतव्यस्थान असेल !

एकदा भगवान बुद्धांकडे एक मनुष्य आला. आणि म्हणाला ” तुमच्या धर्मतत्वांवर मी बराच विचार केला. पण माझ्या आयुष्यात काही फरक पडला नाही.”
तेव्हा बुद्ध हसून त्याला म्हणाले, ” एका गावाला जाण्याचा रस्ता जर तुला एखाद्यानं विचारला, त्याला तू तो सांगितलास, आणि तो तिथेच त्याच्यावर विचार करत थांबला, तर तो त्या गावाला कधी पोहोचेल ?”
“तो जोवर त्या दिशेनं पाऊल टाकत नाही तोपर्यंत कधीच नाही. त्याला त्या दिशेनं सतत प्रवास करत जावं लागेल.”
“तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही तेच आहे. धम्म नुसता विचार-काथ्याकूट करण्यासाठी नाही. तो प्रत्यक्षात, कृतीत आणण्यासाठी आहे. ” भगवान म्हणाले.

साधे जीवन ही पुस्तिका इथे डाउनलोड करता येईल.

(थेट डाउनलोड करण्यासाठी राइट क्लिक करून save link as या पर्यायवर लेफ्ट-क्लिक करा.)


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-19 Sun 12:57