UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


खरेदीस नकार

तेन त्यक्तेन भुंजीथाः|| मा गृधः कस्यस्वित् धनम् ||

अर्थः तये त्यागाने भोगावे || लुबाडू नये कुणालाही ||

–ईशावास्य उपनिषद

पुढील लेख म्हणजे मिस् मिनिमॅलिस्ट यांनी minsumer movement manifesto वर लिहिलेल्या लेखाचा स्वैर अनुवाद आहे. अर्थात् मी यातल्या सर्व विचारांशी सहमत आहेच.

कमितकमी वस्तू विकत घ्यायच्या असं एकदा ठरवलं की एक मजेशीर गोष्ट आपोआप घडते. आपण कोणकोणत्या गोष्टींचा उपभोग घेतो याचा आपण खरोखरच विचार करायला लागतो. आणि मग प्रत्येक गोष्ट विकत घेण्याआधी त्या गोष्टीची खरंच गरज आहे का? असा विचार मनात येतोच.

अशा तऱ्हेनं जाणीवपूर्वक खरेदी करण्याचाच प्रघात पडला तर तर काय विलक्षण गोष्टी घडतील नाही ? आपण फक्त पैसे, वेळ आणि जागा यांची बचत करू असं नाही तर आपली ही पृथ्वी स्वच्छ ठेवू आणि पुढच्या पिढ्यांसाठी नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करू.

या संकल्पनेचा प्रचार-प्रसार-प्रसिद्धी करण्यासाठी या संकल्पनेची नीट व्याख्या करावी लागेल आणि तिला एक नाव द्यावं लागेल. आपल्याला इतरांना हे समजावून सांगावं लागेल की ही एक जगण्यायोग्य जीवनशैली आहे. आणि जे लोक ही शैली स्वीकारतील त्यांना आपण मदत करू शकतो.

आजच्या काळाशी विसंगत वाटणाऱ्या या जीवनशैलीचा हा जाहीरनामाः

अल्पतम ग्राहकत्वाची चळवळ (अर्थात् खरेदीस नकार)

“अमुक गोष्ट खरेदी करू नका ” असं जाहीर आवाहन करणं म्हणजे भांडण- मारामारीला आमंत्रणच ! पण त्या आवाहनात आपली पृथ्वी, समाज आणि आपली आयुष्यं बदलून टाकण्याचं सुप्त सामर्थ्य आहे हे नक्कीच.

इतिहासात घडून गेलेल्या विविध क्रांत्यांप्रमाणे आमची ही चळवळ असमाधानातून जन्मली आहे. आम्हाला सदानकदा कर्जात रहाण्याचा आता उबग आला आहे. न आवडणारी कामं करण्यात दिवस घालवण्याची आम्हाला चीड येते. आणि आम्हाला ज्या गोष्टींची गरज नाही त्या खरेदी करणं आम्हाला आवडत नाही. आमच्या घरात झालेली वस्तूंची गिचमिड आणि आमच्या सुटट्या आम्ही कशा घालवायच्या हे सुद्धा ठरवणारा बाजार आम्हाला नको वाटतो. मानवी हक्क पायदळी तुडवून, पिळवणुकीतून स्वतःची भांडारं भरून टाकणाऱ्या बाजाराची आम्हाला चीड आहे. जन्मसिद्ध हक्क असणारी स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी या गोष्टी देखील आमच्या मुला नातवंडांना मिळतील किंवा नाही याची आम्हाला काळजी वाटते.

आम्ही काही घरसंसार सोडलेले त्यागी साधू नाही. आम्ही झुंडी करून दुकानांवर खळ्ळ-खटाक् छापे घालणाऱ्यांपैकीही नाही. आम्हाला काहीतरी फुकटात हवं आहे असंही नाहीये. आपल्या पूर्वजांप्रमाणे दिवसभर काबाडकष्ट करून फक्त अन्न वस्त्र निवारा यासारख्या गोष्टीच मिळतात अशीही आमची स्थिती नाही. ज्या सहजतेनं आमच्या मूलभूत गरजा भागतात त्या बद्दल बाजाराचं आम्हाला कौतुक आहे. पण तरीही आमचा असा ठाम विश्वास आहे की एकदा का आपल्या मूलभूत गरजा भागल्या की मग इतर भोग हे यादीच्या तळाशी टाकले पाहिजेत. एकदा असं केलं की मग आम्हाला मित्र, कुटुंबीय आणि समाजाबरोबर घालवायला वेळ मोकळा मिळेल. अध्यात्मिक, शारीरिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी हा वेळ आम्ही वापरू. कल्पना करा या वाचलेल्या वेळाचा, पैशाचा, उर्जेचा आणि भांडवलाचाही, किती चांगला उपयोग करता येईल बरं !

पण वस्तूच्या उपभोगाची इच्छा ही एक ऊर्मी असते. तिचं मूळ, अस्तित्व टिकवण्याच्या इच्छेत दडलं आहे. ही ऊर्मी दाबून टाकणे महा कठीण काम आहे. चतुर विक्रेते याच गोष्टीचा धूर्तपणे फायदा घेतात आणि नव्या नव्या “गरजांचे” उत्पादन करतच रहातात, ज्यामुळे आमची समाधानाची भावना दडपली जाते. ते आपल्याला पटवू पहातात की कोणत्यातरी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवाचून आपले आयुष्य अपूर्ण आहे. ते पटवू पहातात की आपली घरे आता जुनी झाली आहेत आणि ती “सुधारून” अधुनिक बनवली पाहीजेत. ते पटवू पहातात की आपण नेहमी नवीनतम वहाने चालवावीत आणि आपले कपडे अत्याधुनिक फॅशनचेच असले पाहिजेत.

तर मग त्यांना आम्ही आता जाहीररित्या सांगत आहोत, की बस् करा हे आता ! आमच्या आयुष्याच्या उरलेल्या महत्वाच्या कालावधीत हपापलेपणा, वस्तू मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यासाठी पैसे देत रहाणं (आणि त्यासाठीच पैसे मिळवत रहाणं) याला आम्ही नकार देत आहो. आम्ही अति-उपभोक्ता नाही. पण उपभोग विरोधीही नाही. आम्ही किमान-उपभोक्ता आहोत. आम्ही आमच्या आयुष्यातलं उपभोगाचं प्रमाण किमान पातळीवर आणत आहोत. हा विचार अमलात आणण्यासाठीची आमची त्रिसूत्री अगदी साधी आहे.

गरजा भागवण्यापुरताच किमान उपभोग घेणे. आमच्या उपभोगाचे निसर्गावर किमान दुष्परिणाम होतील याची काळजी घेणे. आमच्या उपभोगाचे इतर लोकांच्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम कमित कमी करणे.

याप्रकारे आम्ही आमचा पैसा वाया घालवणार नाही. नैसर्गिक साधन संपत्ती चैनीच्या कारणांसाठी वापरणार नाही. आम्ही वस्तूंचा पुनर्वापर करू किंवा जुनी वस्तू वेगळ्याच कारणासाठी वापरू. जुन्या वस्तू वापरण्यावर आमचा भर राहील. माणसांची पिळवणूक करून निर्माण केलेल्या वस्तू वापरण्याचे आम्ही टाळू. अधिकाधिक स्थानिक वस्तूंचा वापर करून स्थानिक अर्थकारणाला गति देऊ आणि दीर्घकालीन टिकाऊ समाजाची निर्मिती होण्यासाठी काम करू.

आम्ही ते जुने साचेबद्ध क्रांतिकारक नाही. आम्ही तुम्हाला निषेध करताना, बहिष्कार घालताना, किंवा धरणे धरताना आढळणार नाही. आम्ही केवळ, वस्तू विकत घ्यायला नकार देत जाऊ. आमची लढाई व्यक्तिगत पातळीवरच राहील. व्यापार क्षेत्रातला हा सविनय आज्ञाभंग लाखो वस्तू विकत न घेतल्या गेल्यामुळे प्रत्यक्षात येईल. फास्ट फूड व इतर तत्सम अन्नपदार्थांकडे आम्ही पूर्ण दुर्लक्ष करू. आम्ही आमची क्रेडिट कार्डे वापरणार नाही. पुस्तके विकत घेण्याऐवजी आम्ही ती ग्रंथालयातून आणू. नवे कपडे विकत घेण्याऐवजी आमचे जुने कपडे आम्ही दुरुस्त करून वापरु. बड्या दुकानांत खरेदी करण्याऐवजी एकमेकांच्या वस्तू अदलाबदल करून वापरू.

आमची सेना अदृश्य आहे. बाजारातला आमचा असहभाग हेच आमचे आक्रमण आहे. रिकाम्या पडलेल्या पार्किंगच्या जागा, दुकानांमधली कमी होणारी गर्दी आणि दुकानांच्या गल्ल्यावरची शांतता हे असेल आमचे आक्रमण. आमच्या क्रांतीत लाल रंग एकच, तो म्हणजे छोट्या दुकानदाराच्या कीर्द खतावणीतली लाल शाई !

आमच्यावर सतत जाहिरातींची बॉंबफेक होत असते. पण आमचे चिलखत अभेद्य आहे. ते आम्हाला अनाकर्षक दिसण्याची, असुरक्षित होण्याची आणि असमाधानी रहाण्याची भीती घालतात. पण आमची सारासारबुद्धी जिवंत आहे. आम्ही दूरदर्शन बंद करतो. नियतकालिकांची वर्गणी भरणे थांबवतो आणि इंटरनेट वापरताना ad-blocker वापरतो. आमचा विरोध ढासळवण्यासाठी ते नवी अस्त्रे बनवतात आणि वापरतात. “नैसर्गिक पदार्थांपासून बनलेली”, “व्हायरल मार्केटिंग” किंवा “विनाव्याजी कर्जांचे” आकर्षण अशी त्यांची नवी अस्त्रे. पण आमचा निश्चय ही अस्त्रे भेदू शकत नाहीत.

आम्ही वेगवेगळ्या रूपांत काम करतो. अध्यात्मवादी, निसर्गवादी, साधी राहणीवाले, मानवी हक्कवाले अशी अामची अनेक रूपे आहेत. पण किमान उपभोक्ता या नावाखाली केलेल्या आमच्या कृतींचे परिणाम दूरगामी आहेत. वस्तू खरेदी नाकारल्याने आम्हाला कर्जापासून, गिचमिडीपासून आणि अनावश्यक स्पर्धेपासून मुक्तता मिळते. वस्तू खरेदी न करण्यामुळे, आम्हाला नवी समाजरचना करण्यासाठी वेळ आणि ऊर्जा उपलब्ध होते. वस्तू खरेदी नाकारल्यामुळे नैसर्गिक साधनांचे स्रोत बड्या कंपन्यांच्या हातातून काढून घेऊन ते आम्हाला आमच्या मुलामाणसांच्या हातात देता येतात..

…आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, वस्तू खरेदी न केल्याने आम्ही स्वतःची व्याख्या नव्याने आणि स्वतः करतो.

ती व्याख्या आम्ही काय करतो त्यावर, आमचे विचार कोणते आहेत त्यावर आणि आमची मानवी मूल्यं कोणती आहेत यावर ठरते. आमच्याकडे कोणत्या वस्तूंची मालकी आहे यावर नाही. या सगळ्या प्रक्रियेत, आमच्या आयुष्याचा नव्याने अर्थ शोधण्याची संधी आम्हाला मिळत असते. ते आम्हाला मिळालेले मोठे पारितोषिक आहे.


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-13 Mon 11:36