समाज-माध्यमे म्हणजे गर्दीच्या शोधात असणारे गरजू लेखक एकत्र येण्याची जागा.. या "लेखकांचा" स्वभाव समाज माध्यमे ठरवतात.. आणि नंतर त्या "लेखकांची" माहिती (कोणाकोणाला कोण जाणे) विकून या कंपन्याच बहु-अब्जाधीश होतात. लेखकांची माहिती न विकणाऱ्या काही साइट्स आहेतही, पण त्या साइट्सना स्वतःचा "स्वभाव" नाही.
म्हणून अनेकांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या संकेतस्थळांची या ठिकाणी दखल घेतलेली नाही. स्वतःचे विचार ठामपणे मांडणारे लोक स्वतःच्या व्यक्तित्वाचा ठसा आपल्या संकेतस्थळावर उमटवतात. ही संकेतस्थळे मुख्यतः व्यक्तिगत आहेत. त्यामुळे या संकेतस्थळांना "स्वभाव" आहे. काही संकेतस्थळे मराठीत आहेत. मराठी पेक्षा इंग्रजी संकेतस्थळांची संख्या अधिक आहे हे ओघाने आलेच. अशा संकेतस्थळांची इथे नोंद करताना, त्या ठिकाणी जाहिराती नसतील अशी कसोटी मी ठेवली आहे. पण "स्वभाव" फारच वेगळा आणि ठाशीव असेल तर मात्र जाहिरातीची कसोटी तात्पुरती स्थगित करतो.
समाज माध्यमे आणि गूगल सारखी शोध इंजिने (खरे तर जाहिरात इंजिने) हातात हात घालून त्यांना सोयीच्या नसलेल्या साइट्स पहिल्या पानावर येऊ देत नाहीत हे अनेकांनी अनुभवले आहे. त्या शिवाय अनेक साइट्सवर सतत मधे घुसणाऱ्या जाहिराती (pop-ups) अत्यंत त्रासदायक असतात. ज्या वेळी साइट पूर्णपणे html वापरून केलेली असते त्यावेळी cookies सुद्धा पाठवल्या जात नाहीत. वाचकांची माहिती अजिबात गोळा न करणाऱ्या संकेतस्थळांना या पानावर प्राधान्य दिले आहे. मात्र अशा साइट्सवर तुम्हाला चकचकीत गोष्टी दिसणार नाहीत याची मानसिक तयारी ठेवलेली बरी !
ही यादी अशीच वाढत राहील. आणि हे पान नेहमी ताजे ठेवील! कदाचित तुमचे संकेतस्थळ (वेबसाइट) या यादीत उद्या दिसू शकेल !!
सशुल्क असो वा निःशुल्क, स्वतःची साइट बनवली की वाचक कसे मिळणार हा लाख मोलाचा प्रश्न असतो. त्याचे उत्तर आहे... थोडा धीर धरा. वेबरिंग, लिंक्स डिरेक्टरीज् आणि माझ्या या संकेतस्थळासारख्या ठिकाणी तुमच्या साइटची लिंक आली की मग सर्च इंजिनांवर तुम्हाला अवलंबून रहावे लागत नाही. एकदा तुमची साइट तयार झाली की इतरांच्या व्यक्तिगत साइटच्या लिंक्स तुम्ही तुमच्या साइटवर टाकू शकता ! काही वर्षे धीर धरलात तर सर्च इंजिनांना देखील तुमची दखल घ्यावीच लागेल !
तुम्हाला वरीलपैकी एखादा मार्ग वापरून स्वतःची साइट बनवायची असेल, किंवा काही शंका असतील तर आमच्याशी जरूर संपर्क साधा.