UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


मी काय वाचू ?

मी पूर्वीपासूनच मुख्य व्यवसाय संभाळताना शिकवण्याचंही काम करत आलो. विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न माझं सतत प्रबोधन करतात. मी काय वाचू ? हा प्रश्न मात्र मला बरंच काही शिकवून गेला.

दुकानांच्या पाट्या, वस्तूला गुंडाळून आलेला वर्तमानपत्राचा कागद या पासून ते अलीकडच्या किंडलमधल्या ई–बुक्स पर्यंत, वाचता काहीही येतं. त्यामुळेच अनेकदा काय वाचू पेक्षा काय वाचू नको हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं ठरतं. माझ्या पुरती या प्रश्नाची ही उत्तरं मी शोधून काढली आहेत.

  • स्वतःच्या मनात द्वेषभावना उत्पन्न करणारं काहीही वाचायचं नाही.
  • चिथावणीखोर आणि प्रक्षोभक लेखन वाचायचं नाही.
  • फक्त विशिष्ट विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी लिहिलेलं प्रचारकी लेखन वाचायचं नाही.

वर दिलेल्या गोष्टी काही वेळा थोडं (किंवा पूर्ण) वाचून झाल्यानंतर मग लक्षात येतात. पण त्या लक्षात आल्यानंतर लगेचच ते वाचन बंद करणं शक्य असतं. जसजसा वाचनाचा सराव होत जातो, तसं असलं लिखाण आणि त्यामागचा उद्देश लौकर स्पष्ट होण्याची कला साध्य होत जाते.

आता काय वाचायचं या प्रश्नाच्या उत्तराकडे वळतो. सगळं वाचायचं. सगळीकडे वाचायचं. आपल्याला ज्या ज्या भाषा येतात त्या सर्व भाषांमधून वाचायचं. कागदावरचं, संगणकाच्या पडद्यावरचं, किंडलवरचं, रस्त्यावरच्या पाट्यांवरचं…

…आणि कागदावरच्या दोन ओळींमधल्या पांढऱ्या जागेतलं वाचायचं, झालंच तर माणसांच्या चेहऱ्यावरचंही वाचायचं.


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-20 Mon 07:48