शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….
गांधीजी प्रणित अर्थव्यवस्था
रोजच्या जीवनातल्या अनेक अडचणींचे मूळ आपल्या चंगळवादी विचारसरणीत आणि जीवनशैलीत आहे हे आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागले आहे. या विषयी मी विविध लेखकांचे विचार पूर्वी मांडलेच आहेत. माझी जीवनशैली अधिकाधिक साधी व्हावी यासाठी माझे सतत प्रयत्न चालू असतात. सुमारे शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी या विषयीचे (चंगळवाद आणि तीव्र औद्योगीकरण) विचार स्वतंत्रपणे व स्पष्टपणे मांडले होते. भारतीय अर्थतज्ञ श्री. जे. सी. कुमारप्पा यांनी या विचारांचे वर्णन गांधीजीप्रणित अर्थव्यवस्था (Gandhian Economy) असे केले.
या विषयाची थोडक्यात ओळख या ठिकाणी करून देत आहेः
गांधीजी नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्र हे एकमेकांपासून तोडत नाहीत. जी अर्थव्यवस्था मानवाच्या नीतिमत्तेला हानी पोहोचवते ती व्यवस्था अनीतिमान आहे असे ते म्हणतात. उद्योगाचे महत्व, तो उद्योग भागधारकांना किती लाभांश देतो यावर अवलंबून नाही तर तो उद्योग साकारणाऱ्या माणसांच्या शरिरावर आणि आत्म्यावर काय परिणाम करतो यावर आहे. म्हणजेच उद्योगात पैशाला महत्व नसून, माणसांना असायला हवे.
गांधीजी प्रणित अर्थविचारांतील पहिले महत्वाचे तत्व आहे साधे व स्वयंपूर्ण जीवन. राहणीमान आणि जीवनाची गुणवत्ता यात फरक करायला हवा हे हा अर्थविचार सांगतो. राहणीमान म्हणजे केवळ अन्न-वस्त्र-निवारा या मूळ गरजांचा विचार. तर जीवनाच्या गुणवत्तेत शारीरिक गरजा भागवण्याबरोबरच आत्मिक, सांस्कृतिक व नैतिक गरजा भागवणेही अंतर्भूत आहे.
या अर्थविचाराचे दुसरे तत्व आहे, स्थानिक संसाधनांचाच वापर करून स्थानिक गरजा भागवणारे लघुउद्योग. त्यामुळे रोजगाराच्या संधी सर्व ठिकाणी उपलब्ध करून देता येतील आणि सर्वोदयाचे ध्येय साध्य होण्यास मदत होईल. सर्वोदयात सर्वांचे कल्याण अभिप्रेत आहे फक्त काही मोजक्यांचे नव्हे. गांधीजी प्रणित अर्थविचार श्रमांचा अधिकाधिक उपयोग करू इच्छितो, श्रम वाचवणे हे त्याचे उद्दिष्टच नव्हे. श्रमिकांना अधिक रोजगारसंधी उपलब्ध करून देणे हे या विचाराचे एक उद्दिष्ट आहे मात्र श्रमिकांना त्यासाठी विस्थापित व्हायला लागू नये. गांधीजींचा यंत्राना विरोध होता ही एक गैरसमजूत आहे. कठीण आणि कंटाळवाणे काम टाळू शकणाऱ्या यंत्रांचे गांधीजींनी नेहमीच स्वागत केले. सिंगर कंपनीच्या श्रमावर चालणाऱ्या शिवणयंत्राचे त्यांनी नेहमी कौतुक केले. श्रमप्रतिष्ठेला गांधीजींच्या अर्थविचारात महत्व होते. प्रत्येकाने भाकरी मिळवण्यासाठी थोडे तरी श्रम केले पाहिजेत असे ते म्हणत. समाजाला श्रम आणि श्रमिकांबद्दल तुच्छता वाटते यावर त्यांनी नित्य टीका केली होती.
गांधीजी प्रणित अर्थविचारांचे तिसरे तत्व आहे, विश्वस्त संकल्पना. आपल्या गरजा भागल्यावर अधिक संपत्ती मिळवण्याचा अधिकार सर्वांनाच आहे पण त्याचा विनियोग सर्वानी ज्यांच्याकडे नाही त्यांच्या साठी (गरिबातल्या गरिबांसाठी) केला पाहिजे असे हे तत्व आहे. या जादा उत्पन्नावर व्यक्ती वा समाजाचा अधिकार केवळ विश्वस्त म्हणूनच राहील. ही संकल्पना विश्वस्त या शब्दामागे आहे.