UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


मुक्त संगणक प्रणाली १

मी मुक्त संगणक प्रणालीचा पुरस्कर्ता आहे. जी.एन्.यू. लिनक्स हे त्याचे सर्वात महत्वाचे उदाहरण आहे. पण त्याखेरीज इतर मुक्त प्रणालीही अस्तित्वात आहेत.मी मुक्त संगणकीय प्रणालींचाच पुरस्कार का करतो असा अनेकांना प्रश्न पडतो. त्याचं सर्वात महत्वाचं उत्तर म्हणजे या प्रणाली संगणकाच्या वापरकर्त्याला मुक्त ठेवतात. जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी विंडोझ प्रणाली ही वापरणाऱ्यांना कोणतेही स्वातंत्र्य देत नाही. इतकंच नव्हे तर त्यांचं स्वातंत्र्य काढून घेेते.

स्वातंत्र्य-कुठे स्वातंत्र्य-कुणा स्वातंत्र्य ?

कविवर्य वसंत बापटांच्या कवितेतली ही ओळ छान आहे. पण….
संगणकाची एखादी प्रणाली वापरण्याचा आणि स्वातंत्र्याचा संबंधच काय ?
कुणाचं स्वातंत्र्य कोणी काढून घेतलं होतं, कोणी मिळवून दिलं ?
हे स्वातंत्र्य इतकं महत्वाचं आहे का ?
काही दिवसांपूर्वी अशाच विषयावर एका सभेत बोलल्यावर एक तरूण मुलगा मला नंतर येऊन भेटला. मला म्हणाला, तुमच्या भाषणातले अनेक मुद्दे कळले पण तुम्ही वर्णन केलेल्या संगणकीय पारतंत्र्याची दाहकता नाही कळली !

आपण भारतीय लोक एकमेकांवर फार अवलंबून असतो. आपल्या कुटुंबावर, शेजाऱ्यावर, गल्लीतल्या लोकांवर, जातीवर, समाजावर आणि देशावर. त्यामुळे आपल्याला व्यक्तिगत स्वातंत्र्याची महती समजलेलीच नाही. ती एकदा समजली की मग ही दाहकता कळून येईल.

हा लेख आपल्यापैकी अनेकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात स्थान मिळवून बसलेल्या संगणकासंबंधातल्या स्वातंत्र्या बद्दल आहे. त्या स्वातंत्र्याच्या महत्वाबद्दल आहे.

संगणकीय स्वातंत्र्याची चार कलमे

  • कोणत्याही कारणासाठी कितीही संगणकांवर ती प्रणाली वापरण्याचे स्वातंत्र्य. (तुम्ही जेव्हा विंडोझ वा तत्सम अमुक्त प्रणाली वापरता त्यावेळी प्रत्येक संगणकासाठी ती वापरण्याचे वेगळे लायसेन्स फी भरून तुम्हाला घ्यावे लागते.)
  • या प्रणालीचा उगम (सोर्स कोड) पाहून अभ्यासण्याचे स्वातंत्र्य. उगमात बदल करून प्रणाली इतर कोणत्याही वेगळ्या कारणासाठी वापरण्याचे स्वातंत्र्य. या सगळ्यासाठी मुक्त प्रणाली लिहिणाऱ्यांनी त्याचा उगम सर्वांसाठी खुला केलेला असलाच पाहिजे.
  • या प्रणालीच्या नकला करून त्या इतरत्र वितरित करण्याचे स्वातंत्र्य. या मुळे तुम्ही तुमच्या मित्रांना – शेजाऱ्यांना मदत करू शकता.
  • मूळ प्रणालीत तुम्ही बदल केल्यानंतर या नव्या रूपातल्या प्रणालीच्या नकला इतरत्र वितरित करण्याचे स्वातंत्र्य. त्यामुळे तुम्ही केलेला बदलही इतरांपर्यंत जाऊन पोहोचतो. यासाठी तुम्ही बदल केलेला उगम या नकला बरोबर उपलब्ध करून देणे अनिवार्य ठरते.

बंधनात टाकणाऱ्या प्रणाली

तुम्हा आम्हाला बंधनात टाकणाऱ्या प्रणाली वर लिहिलेल्या एकाही स्वातंत्र्याचा लाभ देत नाहीत. याचा अर्थ काय ते आधी पाहूया.

कोणतीही संगणकीय प्रणाली लिहिण्यासाठी आधी

  • तिचा सोर्स कोड (उगम कार्य-क्रम) तयार करावा लागतो.
  • तो लिहिल्यावर कंपाइल केला जातो.
  • तेव्हा त्याचे रूपांतर असे होते की संगणक त्याचा वापर करू शकतो. याला एक्झिक्यूटेबल (संगणकीय वापरायोग्य) फाइल असे म्हणतात.
  • आपण जेव्हा ही फाइल संगणकावर चालवतो तेव्हा आपल्याला अपेक्षित काम संगणकाकडून केले जाते.

तुमच्या असं लक्षात येईल की उगम कार्यक्रम हा या पायऱ्यांमधला सर्वात महत्वाचा भाग आहे. उगम कार्यक्रम माणसेच तयार करतात. नंतर त्याचे रूपांतर संगणकामार्फतच वापरायोग्य फाइलमधे केले जाते. एकदा का वापरायोग्य फाइलमधे हे रूपांतर झाले की ती फाइल माणसांना थेट वाचून समजत नाही. पण उगम कार्यक्रम मात्र वाचून समजून घेता येतो. अमुक्त प्रणालींचे निर्माते केवळ अशा फाइल्सच तुमच्या पर्यंत पोचवतात.

कोणतीही अमुक्त प्रणाली कधीही उगम कार्यक्रम वापरकर्त्याला उपलब्ध करून देत नाही. तुम्ही असे विचाराल की मला कुठे उगम कार्यक्रम वाचून समजतो ? आणि समजला तरी त्याचे मी काय करू ?
तुम्हाला स्वतःला जरी हा उगम समजला नाही तरी तुमच्या कोणा मित्र मैत्रिणीला हा समजू शकेल आणि अपेक्षित कार्याशिवाय एखादे गुप्त कार्य ही प्रणाली तुम्हाला अज्ञानात ठेऊन करते आहे का याचा शोध लागेल. पण असे गुप्त (आणि दुष्ट) काम केले जाते का ?
होय असे केले जाते ! तुम्हाला माहिती असलेला संगणकीय व्हायरस हे त्याचे एक उदाहरण आहे. असा व्हायरस तुमच्या एखाद्या नेहमीच्या वापरतल्या (उदा. वर्ड प्रोसेसर) प्रणालीला चिकटतो आणि स्वतःचा दुष्ट कार्यभाग साधतो. पण जर वर्ड प्रोसेसरचा उगम उपलब्ध झाला तर अशा प्रणालीला व्हायरस चिकटू नये याची आधीच काळजी घेता येते.

इंटरनेट एक्सप्लोअरर या मायक्रोसॉफ्टच्या ब्राउजरला असे अनेक जंतू चिकटतात असे सिद्ध झाले आहे. या जंतूंमुळे तुमच्या संगणकावरील माहिती इंटरनेटद्वारे पळवली जाते. शिवाय हा जंतू बाहेरून चिकटला आहे, का मूळ उगमातच अंतर्भूत आहे हा संशय शिल्लक राहतोच. मायक्रोसॉफ्ट आपला कोणताही उगम कार्यक्रम उघड करत नाही. म्हणून त्यांच्या सर्व प्रणाली अमुक्त (आणि धोकादायक) आहेत असे म्हणता येईल.

मुक्त प्रणाली आपला उगम कार्यक्रम इंटरनेटवर जाहीर करतात. तो सतत अनेक तज्ञांच्या देखरेखीखाली असतो. त्यामुळे कोणताही धोका निर्माण होण्याची शक्यता जवळजवळ नसतेच.

आज आपण संगणकीय युगात वावरत आहोत. उच्चशिक्षित व्यक्ति पासून ते अक्षरओळखही नसलेल्या माणसापर्यंत (भ्रमणध्वनी मधे संगणकच असतो.) प्रत्येक जण संगणक मोठ्या प्रमाणात वापरतो. या प्रत्येक संगणकात जर मुक्त प्रणाली वापरली गेली तर माणसाचा खाजगीपणा जपला जाईल आणि बडे भैय्या आपल्यावर सतत नजर ठेवू शकणार नाहीत. बहुचर्चित स्मार्ट-सिटी मधील स्मार्ट यंत्रणांपासून ते मतदान यंत्रांपर्यंत प्रत्येकात लहानसे पण ताकदवान संगणक वापरले जातात हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यातली प्रत्येक प्रणाली मुक्त असायला हवी ही मागणी आपण केली पाहिजे.

मुक्त प्रणालींनी देऊ केलेल्या इतर स्वातंत्र्याचे फायदे पुढच्या लेखात वाचा…


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-15 Wed 15:20