शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….
आंधळ्यांच्या शोधात डोळस
एकदा एका गावात एक हत्ती आला.
तो पहायला आंधळ्यांचा एक जथ्था तिथे गेला.
एका आंधळ्यानं हत्तीचा पाय चाचपला आणि तो म्हणाला, हत्ती खांबासारखा असतो.
एका आंधळ्यानं हत्तीची पाठ चाचपली आणि तो म्हणाला, हत्ती भिंतीसारखा असतो.
ज्या आंधळ्यानं हत्तीची सोंड चाचपली तो म्हणाला हत्ती मुसळासारखा असतो.
ज्यानं हत्तीचे कान चाचपले तो म्हणाला हत्ती सुपासारखा असतो.
ज्यानं हत्तीचे शेपूट चाचपले तो म्हणाला हत्ती खराट्यासारखा असतो.
मग साऱ्यांमधे वाद चालू झाला. जो तो म्हणे की माझेच खरे.
तितक्यात बाजूने चाललेला एक डोळस तिथे आला आणि म्हणाला, अरे मी डोळस आहे. तुम्ही ज्याला पूर्ण हत्ती समजता तो तर हत्तीचा एक एक अवयव आहे पण हत्ती नाही.
तेव्हा आंधळ्यांनी माना डोलावल्या.
मग डोळस पुढे म्हणाला,
हत्ती काळा असतो आणि तो संथ चालतो.
तेव्हा आंधळ्यांनी माना डोलावल्या.
हत्ती हा सर्व जनावरांमधे श्रेष्ठ आहे.
तेव्हा आंधळ्यांनी माना डोलावल्या.
हत्ती फार मोठा असतो म्हणून तो शक्तिशालीही असतो आणि शक्तिशाली होणे फार महत्वाचे आहे. शारीरिक बळ, बुद्धी, सौंदर्य, संपत्ती यांपैकी एक किंवा सर्वांचा उपयोग करून इतरांवर सत्ता मिळवणे हेच आयुष्याचे उद्दिष्ट आहे.…
तेव्हा आंधळ्यांनी माना डोलावल्या.
मग डोळसानं मनाशी खूणगाठ बांधली आणि म्हणाला,
मी डोळस आहे आणि तुम्ही आंधळे तेव्हा माझ्या मागून चाला.
तेव्हा आंधळ्यांनी माना डोलावल्या आणि ते त्याच्या मागून चालू लागले.
तो म्हणाला, मी सूर्य आहे.
तेव्हा आंधळ्यांनी माना डोलावल्या.
माझी दिशा तीच पूर्व.
तेव्हा आंधळ्यांनी माना डोलावल्या.
……….
आंधळे माना डोलावतच राहिले.
तेव्हा डोळसाचे डोळे लकाकले. त्याने आपल्या मनाशी काही निश्चय केला.
…..आणि तो नव्या आंधळ्यांच्या शोधार्थ निघाला.
टीपः सर्व आंधळे माना डोलावतातच असं नाही. पण जे नुसतेच माना डोलावतात ते मात्र ऩिश्चितच आंधळे असतात.