शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….
गावरान मेवा
खंडाळ्याच्या घाटातून जाताना, आदिवासी महिला जांब, जांभळं, बोरं किंवा करवंद विकतात. हा गावरान मेवा आपल्या लहानपणच्या आठवणी जाग्या करतो.
हा मेवा जंगलातल्या झाडांवरून काढून तुमच्या आमच्या पर्यंत आणण्यासाठी आपण त्यांना पैसे देत असतो. अशा वेळी ही झाडं कुणाच्या मालकीची असा प्रश्न आपण विचारत नाही. या प्रकारच्या व्यवसायावर सरकारचा कर असल्याचं ऐकीवात तरी नाही !
गावरान म्हणजे गावाच्या मालकीचं रान. त्यावर इतर कोणत्या व्यवस्थेचा अधिकार नसतो. खाजगी कंपन्यांनी या क्षेत्रात (अजून तरी) प्रवेश केलेला नाही. सगळ्या जंगलांचं राष्ट्रीयीकरण झालं आहे. त्यामुळे सरकारची मालकी या जंगलांवर आहेच. खऱ्या गावरानावर गावाखेरीज कोणाचीच मालकी नको. या जंगलाचा उपयोग गावकऱ्यांनी सहमतीनं ठरवायचा…..
हे सगळं वाचून मागासयुगात गेल्यासारखं वाटतंय ना ? मग पुढे वाचा. . . .
कॉर्पोरेट कंपन्या एका व्यक्तीच्या म्हणजे मालकाच्या फायद्यासाठी, किंवा मूठभर भागधारकांसाठी, आणि सरकारे सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी निर्णय घेतात. आपल्या बहुतेक सगळ्या जीवनाचा ताबा कॉर्पोरेट कंपन्या, सरकार यांनी घेतला आणि सामुदायिक समाजजीवनाचा संकोच होत गेला. गावरान मेवा हे कालच्या आपल्या सामुदायिक जीवनाचं उरलंसुरलं अंग आहे. वस्तू-सेवांचा पूर आणि ऊर्जेचा धूर यांनाच प्रगतीचं लक्षण ठरवलं गेलं. सामुदायिक जीवन हा या दोन्ही (सरकार-व्यापार) व्यवस्थांना अडथळा ठरला. पण त्यामुळे लोकांच्या जीवनाची गुणवत्ता ढासळतच गेली.
गावरान मेव्याशिवाय सामुदायिक जीवनात काय येतं ? कितीतरी गोष्टी !
काल आणि आज
काल सहकार्य, सहोपयोग, सहभोग आणि श्रमदान यांचा काळ होता. आज व्यापार-सरकार संस्कृतीमुळे माणूस माणूस विलग झालेला दिसतो.
- सण समारंभः घरीच खाद्यपदार्थ करायचे, कुटुंबातल्या लोकांप्रमाणेच शेजाऱ्या- पाजाऱ्यांबरोबर एकत्र बसून खायचे ही प्रथा सण समारंभात होती. खाद्यपदार्थ तयार करताना सर्व जण एकमेकांना मदत करायचे. सण समारंभाचा आधार म्हणजे पारंपारिक कथा होत्या. कीर्तनांमधे सांगितलेल्या या कथांसाठी कुणा एकाला रॉयल्टी मिळत नव्हती. दिवाळीत आकाशकंदील घरीच बनवले जात होते. रोषणाई फक्त दिव्यांची होती. धूर करणाऱ्या दारूची नव्हे. व्यापारी किंवा राजकीय नेते उत्सव प्रायोजित करत नव्हते. उत्सव लोक-वर्गणीतून आणि त्यांच्या सहभागानं साजरा होत होता.
- प्रबोधन-करमणूकः कीर्तन, मेळे, प्रवचन, व्याख्यानमाला, कथाकथन, गाण्याचे कार्यक्रम, प्रदर्शन, जत्रा, यात्रा यात लोकांचा सहभाग होता, तो केवळ प्रेक्षक म्हणून नव्हे. करमणुकीच्या व्यवस्थापनात, अर्थकारणात आणि प्रत्यक्ष प्रबोधन-करमणुकीत लोक सामील होत होते. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांची जरुरीच नव्हती.
- खेळः संघभावना, जिंकण्याची जिद्द, व्यायाम, आनंद-उत्साह आणि करमणूक हे खेळांचे मूळ आणि मुख्य उद्देश. ते काल बऱ्याच प्रमाणात साध्य होत होते. काल बाजारानं प्रायोजित केलेले संघ नव्हते. आक्रमक जाहिराती नव्हत्या, दूरदर्शन वर प्रक्षेपण नव्हतं, प्रचंड तिकीटदर नव्हते त्यामुळे मॅच फिक्सिंगही नव्हतं.
- गावरानं-गायरानंः सगळ्या गावाला अधिकार देणाऱ्या या जमिनी होत्या. त्याच्या उपयोगाचं नियंत्रण ग्रामसभेमार्फत होत होतं. गावरान मेव्यावर बाजार हक्क सांगत नव्हता.
- कुटुंब पद्धतीः केवळ एकत्र कुटुंबातच नव्हे तर विकेंद्रित कुटुंबातही माणसं रोज घरी एकत्र जेवत होती. सण साजरे करत होती. समारंभात नटत-थटत होती. अडचणीच्या प्रसंगात एकमेकांना मदत करत होती. अगदी काल पर्यंत संगणक, टी. व्ही. आणि टेलिफोनही घरात समायिक होता. वस्तूंचा पूर आणि ऊर्जेचा धूर वाढला….. आणि कुटुंब (सर्वात छोटं सामुदायिक जीवन) तुटलं.
- वाडा-चाळ संस्कृतीः अनेक कुटुंबं एकत्र येऊन त्यांचं सामुदायिक जीवन या संस्कृतीला समृद्ध करत गेलं.
- टिळकांचा गणेशोत्सवः आजच्या गणेशोत्सवाचं रूप हिडिस झालं आहे असं आपण म्हणतो. पण व्यापारी व्यवस्थेनं ताबा घेण्याआधीचा गणेशोत्सव लोकमान्यांना अपेक्षित होता. तो लोकांनी मान्यता देण्याचा गणेशोत्सव होता बाजारानं नव्हे.
एलिनॉर ऑस्ट्रॉम (७ ऑगस्ट १९३३ ते १२ जून २०१२)या नोबेल विजेत्या महिला संशोधक. त्यांचं याच क्षेत्रातलं (political economy of commons – समुदायाचं अर्थ-राज्यशास्त्र) संशोधन त्यांना नोबेल पारितोषिक देऊन गेलं. सामुदायिक जीवनाचा घटता आकार ही आपल्या चिंतेची गोष्ट असायला हवी. कारण चंगळवादाला टक्कर देण्यासाठी सामुदायिक जीवनाचं अस्त्र फार उपयुक्त आणि प्रभावी आहे. सुदैवानं सामुदायिक जीवनाचा मार्ग अजून पूर्णपणे बंद झालेला नाही असं श्रीमती ऑस्ट्रॉम यांनी म्हटलं होतं.
लोकजीवनात सामुदायिक उपक्रमांचा तुलनेने घटता आकार
व्यापार-सरकार या व्यवस्थेविरुद्ध हरकत घेण्यासारखं काय आहे ? पर्यावरणाला सहन होत नाही इतकी ऊर्जेची उधळपट्टी आणि त्यामुळे उद्याच्या आयुष्याची खात्री न वाटणं (तापमानात होणारी वाढ-ग्रीन हाउस इफेक्ट-ओझोन थर नष्ट होऊन कर्करोगाची वाढलेली शक्यता.) ही व्यापार-बाजार संस्कृती विरुद्धची पहिली हरकत आहे. या संस्कृती विरुद्धची दुसरी हरकत आहे इंधन तेलाचा अतिरेकी वापर. आताच्या वापर-दरा प्रमाणे इंधन तेलं फार तर २०५० पर्यंत टिकतील. त्यामुळे त्यानंतर त्यांच्या वापरावर आधारित व्यवस्था कोसळणं अपेक्षित आहे. सरकार या व्यवस्थेबद्दलची (कोणताही पक्ष असो) पहिली हरकत आहे फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणारी भ्रष्ट कार्यपद्धती. दुसरी हरकत आहे उद्योग-व्यापाराच्या दबावा खाली काम करणं. सामुदायिक जीवन जगताना अडचणी नसतात असं नाही. पण वर उल्लेख केलेल्या व्यवस्थांपेक्षा त्याचे तोटे कमी भयानक आहेत. बहुमतानं निर्णय घ्यायचा नाही, सहमतीनंच घ्यायचा. यामुळे निर्णय प्रक्रिया थोडी सावकाश होईल. पण निर्णय चुकण्याची शक्यता कमी. सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. चुका झाल्या तरी त्याची जबाबदारी सगळ्यांची असेल. अंमलबजावणीत सर्वांचा सहभाग असेल. आयुष्याचा वेग आपोआपच कमी होईल आणि तणाव कमी होतील. आजची गावरानं
आजही काही “गावरानं” अस्तित्वात आहेत. त्यापैकी काहींचा उल्लेख पुढे केला आहे.
- मुक्त संगणक प्रणालीः या प्रणाली कोण्या एका कंपनीच्या (किंवा सरकारच्या) मालकीच्या नाहीत. स्वयंसेवक-प्रोग्रामर्स यात त्यांच्या इच्छेनुसार भर घालू शकतात. सुधारणा करू शकतात. हे त्यांनी मुक्त प्रणालींच्या क्षेत्रात केलेलं श्रमदानच आहे. सहकार्य, सहोपयोग, सहोपभोग आणि श्रमदान या तत्वांचं पालन करणारं हे जीवंत उदाहरण आहे.
- विकिपिडियाः लोकांनी एकत्र येऊन संपादित केलेला डिजिटल ज्ञानकोष म्हणजे विकिपिडिया . विषयानुसार चर्चा, सतत सुधारणा, माहितीचे सर्वाधिकार लोकांना दिलेले. हे ज्ञानाच्या गावरान-मेव्याचं एक ज्वलंत उदाहरणच.
- मुक्त हार्डवेअर प्रकल्पः आर्डुइनो, रेपरॅप यासारखे प्रकल्प, तंत्रज्ञान झाकून ठेवत नाहीत. नवं संशोधन सगळ्यांसाठी खुलं करून त्याचा सर्वांना फायदा व्हावा यासाठी ते कटिबद्ध आहेत. आर्डुइनो प्रकल्पात नव्या कल्पना साकारण्यासाठी (prototype building) मायक्रोकंट्रोलर या इ-मेंदूचा वापर करून हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुलं केलं आहे. रेपरॅप (त्रिमिती प्रिंटर) प्रकल्प छोट्या वस्तूंचे सुटे भाग “छापू” शकतो. पुढे दिलेल्या फोटोत पालक (parent) रेपरॅप ने तयार केलेला बालक (child) रेपरॅप दाखवला आहे. ही सृष्टीशी चाललेली स्पर्धाच आहे ! रेपरॅपचं तंत्रज्ञान सर्वांसाठी खुलं आहे.
पालक आणि बालक !
व्यापार-बाजार व्यवस्था लांबच्या वाहतुकीला उत्तेजन देते कारण ही व्यवस्था खनिज-तेल केंद्रित आहे. त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न (प्रदूषण, ताण-तणाव, त्यासाठीच्या रस्ते, वीज, संपर्क या सारख्या पायाभूत गोष्टींचे ऊर्जाभक्षण) ही व्यवस्था सोडवू शकत नाही. इतकंच नाही तर ते प्रश्न वाढतच जातात. उत्पादनाच्या स्थानिकीकरणाला विरोध निर्माण होतो. श्रीमंत कंपन्या ज्या भूभागात आहेत ते भूभाग आपल्या अटी इतर प्रदेशांवर लादतात आणि फक्त स्वतःच अाणखी श्रीमंत होतात, हा इतिहास आणि वर्तमान आहे. यातून सुटण्यासाठी खुलं तंत्रज्ञान वापरून उत्पादनांचं स्थानिकीकरण आणि सामुदायिक जीवनात वाढ हाच उपाय आहे. आपण काय करू शकतो ?
आपण नवी “गावरानं” निर्माण करू शकतो. पुढे केवळ थोडीशीच उदाहरणं दिली आहेत. तुमच्या कल्पनाशक्तीला ताण देऊन तुम्ही यात भर घालू शकता. मग त्याची अंमलबजावणी करू शकता.
- श्रमदानः तुम्ही शहरात हौसिंग सोसायटीच्या इमारती व्यतिरिक्त उरलेल्या जागेत भाजी बाग लावू शकता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोकळ्या जागांचा वापर फुलझाडं, फळझाडं, भाजी लावण्यासाठी करू शकता.
- सहोपयोगः अऩेक वस्तू (उदा. व्हॅक्युम क्लीनर, यांत्रिक करवत, ड्रिलिंग मशीन) आपण वर्षातून ४-५ वेळाच वापरतो. अशा गोष्टी घरोघरी विकत न घेता, एखादा गट करून एकमेकांच्या वापरल्या तर कमी गरजेच्या वस्तूंवर अफाट खर्च होणार नाही. या निमित्तानं (खरंखुरं) सोशलायझेशनही होईल.
- सहकार्यः खुलं तंत्रज्ञान (आर्डुइनो, मुक्त प्रणाली) वापरून किंवा निर्माण करून ते इतरांसाठी खुलं करायचं. त्यामुळे उत्पादनाच्या स्थानिकीकरणाला बळ मिळेल. वाहतूक (आणि म्हणून इंधन तेल) वाचेल, किंमत कमी होईल. बड्या कंपन्यांचा आपल्या आयुष्यावरचा वचक कमी होईल. उत्सव पुन्हा एकदा (प्रायोजित नव्हे) सार्वजनिक करायचे. चार लोकांना बरोबर घेऊन आपणच (प्रवासी कंपनी न गाठता) ट्रेक काढायचा.
- सहोपभोगः तयार खाद्य पदार्थ विकत न घेता स्वतः बनवून सण साजरे करायचे. स्थानिक कलाकारांच्या नृत्याचे कार्यक्रम, गायनाच्या मैफिली स्वतःच आयोजित करायच्या. रोज एकदा तरी कुुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र (घरी) जेवायला बसायचं. लँडलाइन टेलिफोन वर एकमेकांसाठी निरोप घ्यायचे-द्यायचे. आठवड्यातून एकदा तरी टी.व्ही. वर सगळ्यांनी एकच सिनेमा एकाच खोलीत पहायचा. आठवड्यातला किमान एक दिवस तरी मोबाइल बंद ठेवायचा. जवळपासच्याच माणसांशी सरळ हवेतून शब्दांची देवघेव करायची. समोरच्याला गरज असेल तर पाठीवर हात ठेवून धीर द्यायचा…. आणि समोरच्याच्या डोळ्यात दुःखाश्रू असतील तर ते रुमाला शिवाय पुसायचे ……