शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….
मला समजलेले बौद्ध तत्वज्ञान ३
बुद्धाचा धर्म खऱ्या अर्थानं व्यक्तिगत उन्नतीसाठी आहे. चार आर्य सत्यं जाणून घेतल्यावर आठपदरी मार्गावरून मार्गक्रमणा करत निर्वाणपद मिळवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे.
प्रज्ञा, शील आणि करुणा हे तीन शब्द अनेकदा बौद्ध तत्वज्ञानात येतात. त्यांचा उहापोह या लेखात मी करणार आहे.
आठ पदरी मार्गातील शेवटचे दोन पदर म्हणजे सम्यक् स्मृति आणि सम्यक् समाधी.
जागरूकपणे जगण्याचं भान म्हणजे प्रज्ञा. वेगवेगळ्या ध्यान पद्धती अनुसरून समाधीचा लाभ मिळवणे हा भिक्खूच्या दिनचर्येचाच भाग आहे. पण समाधीचा लाभ हे काही उद्दिष्ट नव्हे. उलट त्याचा अतिरेक करू नका असं तथागत बुद्धांचं स्पष्ट सांगणं आहे. स्मृतींचे नियंत्रण आणि समाधीचा अनुभव घेत घेत प्रज्ञा (स्वतः आणि परिस्थिती बद्दलचे शुद्ध ज्ञान होण्याची क्षमता) विकसित होणे महत्वाचे. ध्यानाने स्मृतींचे नियंत्रण करताना स्वतःचे जागरूक निरीक्षण केले जाते. त्यामुळे प्रज्ञा विकसित होत रहाते.
प्रज्ञा विकसित झालेली व्यक्ति जगात वावरतेच. तिचे चारित्र्य शुद्ध असायला हवे असा बुद्धांचा आग्रह आहे. हे शुद्ध चारित्र्य म्हणजेच शील. अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), वैराग्य, ब्रह्मचर्य, असंग्रह अशा अनेक यम नियमांचं पालन या व्यक्तिनं करायचं आहे. ( बुद्धानंतरच्या काळात अष्टांग योगाचे सूत्रबद्ध विवेचन करताना पातंजलिंनी यम नियमात या गोष्टींचा उल्लेख केलाच आहे. फरक सांगायचाच तर फक्त ईश्वरप्रणिधान या नियमाशी बुद्ध सहमत नाहीत. कारण ईश्वर -आत्मा या विषयी बुद्धांना संशय आहे. )
शीलवान आणि प्रज्ञावान व्यक्तीने सर्वत्र पहाताना करुणामय दृष्टीने पाहिले पाहिजे असं बुद्ध म्हणतात. शील आणि प्रज्ञा यांचा बहुसंख्य समाजात असणारा अभाव शीलवान आणि प्रज्ञावान व्यक्तीत अहंमन्यता निर्माण करू शकतो. म्हणून इंतरांप्रति तुच्छता न बाळगता करुणेने त्यांच्या कडे पाहणे गरजेचे आहे.
करुणेचा मांडलेला विचार मला फार महत्वाचा वाटतो. सौंदर्य, विशेष कौशल्य, बुद्धी (प्रज्ञा), संपत्ती, शारीरिक शक्ती आणि शील या पैकी एक किंवा अनेक गोष्टी ज्यांच्या कडे आहेत, त्यांचा ओढा इतरांवर (विशेषतः या पैकी ज्यांच्याकडे जे नाही त्यांच्यावर) सत्ता गाजवण्याकडे असतो. त्यांना त्या पासून करूणा परावृत्त करेल. युद्धाचा निषेध करणारा, राजसत्ता सोडून देऊन तपश्चर्येसाठी निघुन जाणारा बुद्ध करुणेचा उपदेश करण्यासाठी सर्वथैव योग्य नाही का ?