शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….
सायकलस्वारी
सुमारे २२ वर्षांपूर्वी इतर सर्व वाहने वापरण्याचे सोडून मी फक्त सायकल वापरायला सुरुवात केली. त्या आधी इंधनचालित विविध दुचाक्या वापरून झाल्या होत्या.
तीन चाकी घेण्याची इच्छा नव्हती आणि चार चाकी वापरणे हे अगदी अशक्य नसले तरी ती चैनीची वस्तू आहे असं माझं मत होतं. अजूनही आहे.
त्या आधी एक प्रसंग घडला होता. नागपूरला एका मोठ्या कंपनीच्या प्रॉडक्ट डिझायनिंगच्या कामासाठी मी जात असे. विमानाने गेल्याने आपली प्रतिष्ठा वाढते असं त्यावेळी मला वाटत असे. विमानतळावरून बाहेर पडल्यावर विमान-कंपनीच्या गाडीने आम्हाला शहराच्या एका भागात सोडले. तिथून हॉटेलात जाण्यासाठी एखादं वाहन मिळतं का ते पहात होतो. सायकल-रिक्षा खेरीज एकही वाहन मला त्या दिवशी मिळालं नाही. विमानातून उतरल्यावर सायकल-रिक्षा हा अनुभव केवळ विरोधाभास नव्हता. तो इतरही काही शिकवून जाणार होता. सायकल रिक्षातून उतरून एका बड्या हॉटेलमधे मी शिरलो आणि तिथे पहिले सोपस्कार पार पाडायला मला बराच वेळ, सुमारे अर्धा तास, लागला. इतक्या वेळानंतर माझ्या लक्षात आलं की सायकल रिक्षावाल्याला मी त्याचे पैसे दिलेलेच नव्हते. मोठ्या हॉटेलात स्वागतकक्षात यायला तो बिचकत असणार किंवा त्याला तशी परवानगीच नसेल. मी जवळ जवळ पळतच बाहेर गेलो. पायांनी सायकल चालवत मला ओढून आणणारा रिक्षावाला माझ्यासाठी अर्धा तास थांबून होता. मी देण्याची रक्कम त्याच्यासाठी महत्वाचीच होती. तीन रुपये! तो रागावला नव्हता. त्याचं न रागावणं मला शिकवून गेलं.
असा अनुभव बरंच काही शिकवतो. त्यातून शिकूनच कायमसाठी सायकल चालवण्याचा निर्णय घेतला असंं काही मी ठामपणे सांगू शकणार नाही. पण हा प्रसंग महत्वाचा ठरला हे नक्की. पुढे मी तळेगावलाच geodesic domes बांधायचं काम घेतलं. या कंपनीचॆ मालक होते श्री. क्षीरसागर. ते वयस्कर होते आणि सामाजिक भान असणारे होते. मोठा कारखाना चालवणारा हा माणूस पुण्याहून अनेकदा बसनेच तळेगावपर्यंत येत असे. त्यांच्यापाशी सायकलचे रूपांतर इलेक्ट्रिक-बाइक मधे करण्याची इच्छा मी बोलून दाखवली. तेव्हा नुसती सायकलही कायमची वापरायला काय हरकत आहे असं ते म्हणून गेले.
आपण असा निर्णय घेतलाच तर काही मोठे लोकतरी (संख्येनं कमी असले तरी) आपलं कौतुक करतील असं लक्षात आल्यामुळे मी बहुधा कायमचा सायकलस्वार होण्याचं ठरवलं.
पुढे मी सायकलींच्या प्रेमातच पडलो. एक छान हर्क्यूलिस-mtb सायकल घेतली आणि हौशीनं त्याला गिअर्स बसवून घेतले. पण काही महिन्यातच ते काढून टाकले कारण अशा सायकलीच्या दुरुस्तीचं काम आमच्या तळेगावला तर नाहीच पण पुण्यातही फक्त फडके हौदापाशीच होतं हे माझ्या लक्षात आलं. शिवाय हे गिअर्स एकदा चक्क अडकून बसले आणि त्यावेळी मी चौकातल्या गर्दीच्या रहदारीत होतो. नंतर सायकलवरून जसे मी गिअर्स काढले, तसा त्यांचा विषय डोक्यातूनही काढूनच टाकला.
सायकलचा इतिहास मी इथे लिहीत बसणार नाही. तो तुम्हाला विकीपिडियाच्या लिंकवर वाचता येईल. महिलांनी सायकल वापरावी यासाठी अमेरिकेतल्या women’s freedom चळवळीतल्या महिला (१८९० सालची गोष्ट आहे ही) प्रचार करीत असत. त्यापैकी एका महिलेचे वाक्य मला वाचलेले आठवते. सायकल वापरल्याने अनेक बाबतीत तुम्हाला पुरुषांवर अवलंबून रहावं लागत नाही. असं ही महिला म्हणते. महिलांना पुरुषांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सायकलनं मोठा वाटा उचलला हे नक्की. आणखी एक गमतीची गोष्ट मला आठवते. किर्लोस्कर कंपनीचे अध्वर्यू संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर पूर्वी काही काळ सायकलचं दुकान चालवत असत, आणि त्यांनी इंग्रज मडमांना सायकल शिकवण्याचे क्लासेसही चालवले होते असा उल्लेख एका ठिकाणी मला वाचायला मिळाला. म्हणजे सायकलशी संबंधित लोकांचं भवितव्य उज्ज्वल असतं असं मानायला हरकत नाही.
सायकल दिसायला साधी आणि चालवायला सोपी असते. सायकल किंमतीला आणि वापरासाठी स्वस्त असते, वजनाला हलकी असते. सायकल आकाराने छोटी असते त्यामुळे छोट्या जागेतही मावते. सायकलसाठी वाहतुकीचे नियम बरेच शिथिल असतात. सायकलस्वाराला पोलिसांचा आणि भिकाऱ्यांचा त्रास सहसा होत नाही. सायकल चालू असताना धूर सोडत नाही प्रचंड आवाजही करत नाही. गरज पडली तर सायकल डबल सीट नेऊ शकते. सायकल भरपूर वजन वाहून नेऊ शकते. हे सगळे गुणधर्म पुस्तकातले वाचून तुमच्यासमोर लिहून ठेवलेले नाहीत, हे सर्व माझे अनुभव आहेत.
माझी शाळा आमच्या घरापासून जवळच होती. त्यामुळे शाळेत मी पायी चालत किंवा (मधल्या सुट्टीत) अनेकदा पळतपळत जात असे. सायकलवरून शाळेत जाणं हे त्यावेळी माझं आकर्षण होतं. हल्ली शाळेत जाताना सायकल वापरणाऱ्या मुलांची संख्या खूप असते. त्यांचा मला हेवा वाटतो. पण एकदा का ही मुलं कॉलेजात गेली की त्यांचं हे शहाणपण कुठे जातं हे कोडंच म्हणायचं. आमच्या कॉलेजात सायकलवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होतीच. पण आमचे काही प्राध्यापकही अनेकदा सायकलवरून असलेले मला आठवतात. आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभाग-प्रमुख प्रा. धडफळे, प्रा. घटिकर हे त्यापैकीच. त्यावेळी माणसाची प्रतिष्ठा वाहनावरून ठरवण्याची पद्धत नव्हती!
सायकल मागचे तंत्रज्ञान साधे वाटले तरी तांत्रिक दृष्ट्या ते विलक्षणच म्हटले पाहिजे. मुळात स्थिरतेच्या दृष्टीने फक्त दोनच चाकांवर वाहन चालवणे म्हणजे वेडेपणाच. दोन बिंदूंतून एकच रेषा जाते, स्थिरतेसाठी किमान तिसऱ्या बिंदूची गरज भासते हे गणितात घोकलेलं वाक्य. त्यामुळे ज्याला कोणाला दोनच चाकांवर बैलाऐवजी स्वतःच पायांनी पुढे ओढणाऱ्या वाहनाचे स्वप्न पडले असेल तो द्रष्टाच म्हणायचा. चाकाच्या शोधानंतर दोन चाके आणि ओढणाऱ्या प्राण्याचे पाय, असे अनेक बिंदू वापरून रथ किंवा बैलगाडी प्रथम स्थिर आणि नंतर गतिमानही झाली. पण जो वाहनावर किंवा वाहनात बसणार तोच सारथी चाकांना, खाली न उतरता गती देणार ही कल्पना म्हणजे क्रांतिकारकच नाही का?
सायकलची चाके ही सुद्धा क्रांतिकारक कल्पनांचा परिपाकच. वजनाला हलकी, तरीही दणकट, भौतिकशास्त्राच्या नियमांच्या अधिकाधिक जवळ जाणारी. माणसाने ओढायची असल्यामुळे लाकडी किंवा लोखंडी चाके अशक्यच. त्यामुळे जास्त दाबाची हवा रबरी ट्यूबच्या पिशवीत भरून पिशवीला टणक रबराचे बाह्य आवरण असणे हिताचे ठरले. हलक्या धातूच्या धावेवर ही हवेची रबरी पिशवी बसवली आणि चाक तयार झाले…. पण नाही. चाकाचे आरेसुद्धा महत्वाचे. चाक एकाच बिंदूवर रस्त्याला टेकणारे त्यामुळे रस्त्याकडून येणारी प्रतिक्रिया सहन करण्यासाठी आधीच ताणलेले स्पोक्स धावेपासून चाकाच्या केंद्रापर्यंत बसवलेले. हे प्री-स्ट्रेस्ड तंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण.
दुचाकी सायकल माणसाला वापरता येईल. त्यासाठी थोडी सवय करणे पुरेसे आहे हे पहिल्यांदा लक्षात येणे हाही चमत्कारच. आपण सायकल कशी चालवतो, याचं नीट निरीक्षण केलं तर किती किचकट क्रिया आपला मेंदू सवयीमुळे करत असतो हे कळेल. तोल सावरण्यासाठी निगेटिव्ह फीडबॅक हे कंट्रोल सिस्टीम्समधले तत्व मेंदू किती बिनचूक वापरतो ते पहा. तोल सावरण्यासाठी आपण डावीकडे झुकू लागल्यावर उजवीकडे वजन टाकण्याची कला मेंदू शिकला की तोल साधलाच. त्यातही तोल सावरत पुढेही जायचे आहे त्यामुळे डावीकडे सायकल झुकू लागली तर उजवीकडचे पायडल पुढे दाबायचे आणि तशीच गोष्ट डावे पायडल मारण्याच्या बाबतीत. बादलीत उभे राहून बादली उचलता येणार नाही पण ज्या सायकलवर बसायचे ती स्वतःच पुढे नेता येईल अशी कल्पना करता येणे हे सायकलीच्या मूळ निर्मात्याचे बुद्धिवैभवच म्हणायला हवे.
इतर वाहनांच्या तुलनेत सायकलची किंमत कमी. वर्षापूर्वी माझी जुन्या पद्धतीची (नवी) सायकल मी ३५०० रु. ला विकत घेतली. हे वाहन चालवायला इंधन लागत नाही त्यामुळे सायकल वापराचा खर्च फक्त देखभाल आणि दुरुस्ती खर्चापुरताच मर्यादित. मी तर हातानं हवा भरण्याचा पंप वापरतो त्यामुळे हवेचा खर्चही जवळ जवळ शून्यच. गेल्या दीड वर्षात सायकलसाठी (पूर्ण वेळ सायकलच वापरूनही) मी फार तर १०० रु. खर्च केला असेल. सायकल नेहमीच सर्वार्थाने परवडते. नगण्य खर्चामुळे आणि शरीराला घडणाऱ्या व्यायामामुळेही. पर्यावरणदृष्ट्याही सायकल परवडते कारण ती धूर सोडत नाही.
सायकल वापरण्याचा संबंध व्यक्तिगत (आणि राष्ट्राच्याही) प्रगतीशी जोडण्याची चूक आपण करून बसलो आहोत. बऱ्याच वर्षांपूर्वी एक अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ भारताला भेट देऊन गेला. इथे सायकलींची संख्या खूप आहे. इथे इतर प्रकारची इंधन वाहने मोठ्या प्रमाणात आली तर(च) या देशाची (आणि अमेरिकेची) “प्रगती” वेगाने होईल असं मत त्यानं आपल्या अहवालात नोंदवलं होतं. भारतात कोणत्याही देशापेक्षा (भारतापेक्षाही) अमेरिका अतिशय लोकप्रिय असल्यामुळे की काय, आम्ही त्याचा सल्ला मानला. नंतर पूना शहराचे लूना शहर झाले. अलीकडे तर सर्व इंधनवाल्यांनी पुण्यावर इतका जबरदस्त हल्ला केला, की आता पुण्याला कोणतेच नाव देणे शक्य नाही. पण नाव तर व्यक्तित्व असणाऱ्या शहराला देता येते. गोंधळाला (chaos) नाव कसे देता येईल? असे कितीतरी गोंधळ आपल्या भारतात आता सापडतील.
युरोपातले अनेक देश मात्र पर्यावरण, व्यायाम, सोय यांचा विचार करून सायकलच्या बाबतीत वेळीच जागे झाले आहेत. लोकांनी सायकल मोठ्या प्रमाणावर वापरावी यासाठी मोफत सायकल योजना काही युरोपीय शहरांनी अमलात आणल्या आहेत. रेल्वेतून घेऊन जाण्यासारखी घडीची सायकल मोठ्या सफरीसाठी अनेकांना उपयोगाची ठरते. तिचा वापर अनेक जण किंवा जणी रोजच्या कामाला येण्या-जाण्यासाठी करतात. याचे रहस्य फक्त सरकारी योजनांमधे नाही. तर सायकल चालवणे न चालवणे याचा संबंध वापरणाऱ्यांनी प्रतिष्ठेशी जोडलेला नाही. शिवाय पर्यावरणीय चर्चांकडे तुच्छतेनं न पहाता, पर्यावरण स्वच्छ राखण्यात आपला सहभाग असावा ही प्रामाणिक भूमिका पाश्यात्य देशात आपल्यापेक्षा अधिक आढळते. चीन मधे विद्युत सायकलींचा वापर वाढला आहे पण अजूनही चीन सायकलींचा देश म्हणून ओळखला जातो. आफ्रिकन देशातही सायकलचे महत्व फार मोठे आहे. आफ्रिकेतल्या काही देशात तर सायकलचा वापर टॅक्सी सारखाही केला जातो. प्रदूषण न करणारी ही टॅक्सी चालवणाऱ्याला जवळ जवळ १०० टक्के मोबदला देते. कारण टॅक्सी भाड्यातून इंधनाचा खर्च वजा जात नाही.
मध्यंतरी इंटरनेटवर देशोदेशीच्या गरजू स्त्री-पुरुषांना सायकल वाटप करणाऱ्या संस्थेची माहिती वाचनात आली. (इथे वाचा)मी आणि माझ्या काही मित्रांनी स्वतःच्या जुन्या, चांगल्या पण वापरात नसणाऱ्या सायकली जवळच्या गावातल्या मुलींना देणे सुरू केले. पाण्याची कळशी नदी किंवा विहिरीवरून घरी आणण्यापासून ते शाळा कॉलेजात जाण्यापर्यंत त्या या सायकली वापरतात. हा नेहमी चालणारा उपक्रम नसला तरी जेव्हा शक्य असेल तेव्हा आम्ही तो अमलात आणतोच.
मी पूर्णवेळ सायकल वापरायला सुरुवात केली. ‘नंतर काही वेळानं येईल वळणावर’ असं अनेकांना त्यावेळी वाटलं असणार. मलाही तितकीशी खात्री नव्हती. पण हे जमलं. काहींना कौतुक वाटलं. काहीनी टीका केली. काहीनी तुच्छतेनं पाहिलं, दुर्लक्ष केलं. मी साऱ्यांकडेच दुर्लक्ष केलं ! अनेक अनुभव आले. त्यातले काही लक्षात राहण्यासारखे आहेत. माझ्या ऑफिसच्या शेजारच्या इमारतीत रहाणारे एक गृहस्थ एक दिवस मी सायकल चालवताना मला थांबवून म्हणाले, तुम्ही काय शिकलात? मी इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे हे समजल्यावर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला- मग वेळीच वीज बोर्डात अर्ज का नाही केलात? काही गोष्टी करणं आयुष्यात राहून जातं असं सांगून मी वेळ मारून नेली. दुसरा अनुभव एका लघुउद्योजकाचा. त्यांच्या कारखान्यासाठी नवे प्रॉडक्ट डिझाइन करायला मी जात असे. एकदा काम संपवून दोघे बरोबरच बाहेर पडलो, तेव्हा तुम्ही कसे जाणार असं त्यांनी विचारलं मी सायकलने जाणार हे कळल्यावर, त्यांनी (बहुधा माझी दया येऊन) स्वतःची जुनी स्कूटर मला वापरण्यासाठी देऊ केलेली मला आठवते.
अनेक समाजसेवी संस्थांमार्फत सायकलफेऱ्या काढल्या जातात. अशा एका फेरीत सहभागी होण्याचं निमंत्रण आलं म्हणून मी गेलो. वर्षभर सायकल चालवणाऱ्या सर्व व्यक्तींना (आंतर्राष्ट्रीय फंडातून पैसे घेऊन) संस्थेतर्फे पुढील वर्षी सायकल बक्षिस मिळेल असं आश्वासन संस्थेच्या प्रादेशिक प्रमुखांनी दिलं. मी माझी सायकलवरची निष्ठा व्यक्त करून या बक्षिसासाठी उमेदवारी नोंदवली. या घटनेला बरीच वर्षे होऊन गेली माझा उमेदवारी अर्ज अद्याप पडूनच असावा. एका मोठ्या कंपनीचे प्रमुख काही काळ सायकलवरून घर ते कंपनीचे कार्यालय अशी ये जा करीत असत. त्यावेळी त्यांना कंपनीने दिलेली गाडी मागेमागे येत असे हे मी ऐकले आहे. एकदा मी वाचले होते की सरोजिनी नायडू गांधीजींना म्हणाल्या होत्या… ” Bapu, isn’t it costly to keep you poor? ” पुण्याच्या एका सायकल फेरीत प्रसिद्ध डॉ. ग्रँट सहभागी होत असत. पुण्याचे प्रसिद्ध स्त्रीरोग-तज्ञ डॉ. शिरीष पटवर्धन पूर्ण वेळ सायकल वापरतात. सिव्हिल इंजिनिअर असलेले माझे सासरे श्री. शरच्चंद्र पटवर्धन सत्तरीतही सायकलस्वार आहेत. या माझ्यासाठी कौतुकाच्या आणि आदराच्या बाबी आहेत.
माझ्यासाठी सायकल हे केवळ वाहन नाही. ती एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली माझ्या बरोबरच चित्राने (माझी बायको) बिनतक्रार आणि आनंदाने स्वीकारली आहे. जीवनाला आलेला अतिरेकी वेग माणसांची फरपट घडवून आणतो हे मी पाहिले आहे. माझा अधिकाधिक वेळ निर्मितीत, समाधानात जावा ही माझी भूमिका आहे. निर्मिती आणि समाधान विकत घेता येत नाही हे मला पटले आहे. दैनंदिन आयुष्य अधिकाधिक सहज-साधे करण्याची संधी आणि मार्ग मी शोधत रहातो. स्वच्छ पर्यावरण, उत्तम आरोग्य, भरपूर आयुष्य ही त्या जीवनशैलीची उप-उत्पादने (by products) आहेत.
मला एका ओळखीच्या चहावाल्याने एकदा विचारले, “तुम्ही इंधनवाहन का वापरत नाही ? तुम्ही एकट्याने सायकल चालवून पर्यावरण कितीसे स्वच्छ रहाणार, किती रस्ते कितीसे मोकळे होणार ?” माझ्या कडे त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्यावेळी नव्हते. नंतर एक छोटीशी गोष्ट वाचनात आली…
एकदा एका सागरकिनारी, एक साधू खाली वाकून, ओहोटीच्या वेळी आत आलेले तडफडणारे मासे गोळा करून दूरवर समुद्रात फेकत होता. त्याला पाहून एकाने विचारले, “तुम्ही एकटेच, असे कितीसे मासे वाचवू शकाल ? किनारा तर अफाट आहे आणि अशा अनेक ओहोट्या येतच रहाणार ना ?” साधूने लगेच उत्तर दिले नाही. तो पुन्हा खाली वाकला, त्याने आणखी एक तडफडणारा मासा उचलला, त्याला पुन्हा पाण्यात सोडून जीवदान दिले आणि तो म्हणाला… “याला तर मी वाचवले !”
(२८ एप्रिल २०१२)