शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….
अॅक्रामधे सापडलेले हस्तलिखित
तारीख १४ जुलै, १०९९. विविध धर्मांना पवित्र असणारे तीर्थस्थळ. दहाव्या शतकाच्या या अखेरीला या शहरावर फ्रेंच सैन्याचा हल्ला होणार आहे. या शहरात ज्यू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तीनही धर्मांचे लोक हजर आहेत. फ्रेंच सैन्य बलाढ्य आहे याची त्यांना कल्पना आहे. पराभव निश्चित आहे. तरीही त्यांच्याशी लढण्यासाठी हे तीनही धर्माचे लोक सज्ज आहेत.
उद्या सकाळी हल्ला होणार हे माहिती असूनही आज सायंकाळी अनेक लढणारे आणि न लढणारे एकत्र येतात. कारण कॉप्ट काय म्हणतो हे त्यांना ऐकायचे आहे. कॉप्ट हा तत्ववेत्ता आहे. तो कोणताच धर्म मानत नाही. त्याने अनेक गोष्टींचे स्वतः निरीक्षण केले आहे, त्यांची नोंद करून स्वतःची मते बनवली आहेत. कोण्या एका दिव्य शक्तीला मात्र तो मानतो. सर्व प्रश्नांची उत्तरे ठावूक असल्याचा दावा तो करत नाही पण दिव्य शक्तीने परिशुद्ध झाल्यानंतर त्याच्या तोंडून ती उत्तरे येतील अशी त्याची श्रद्धा आहे.
युद्धाच्या आदल्या सायंकाळी अशा या कॉप्टचे म्हणणे ऐकण्यासाठी लोक जमले आहेत….
या लोकांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची कॉप्टने दिलेली उत्तरे म्हणजे पॉलो कोएल्हो यांचे हे जगप्रसिद्ध पुस्तकः Manuscript Found In Accra.
पॉलो कोएल्हो हे ब्राझील देशात जन्मलेले सिद्धहस्त लेखक. विविध विषयांवर सारख्याच सहजतेने चालणारी त्यांची लेखणी याही पुस्तकात त्यांच्या रम्य शैलीचे दर्शन घडवते.
एक तरूण म्हणाला,
तुझे शब्द सुंदर वाटतात. पण सत्य मात्र निराळेच आहे. ते असे आहे की निवड करण्यासाठी आमच्यासमोर पर्याय नसतातच. जीवनपद्धती आणि समाज यांनी आमचे भवितव्य आधीच ठरवून टाकले आहे.
एका वृद्ध माणसाने त्याला दुजोरा देताना म्हटले,
आणि आम्हाला भूतकाळात परत जाऊन हे सारे बदलता येत नाही.
कॉप्ट उत्तरलाः-
होय कोणीही भूतकालात परत जाऊ शकत नाही. पण प्रत्येक जण पुढे भविष्यात तर जाऊ शकतो. ..
आणि उद्या जेव्हा सूर्य वर येईल, तेव्हा तुम्ही स्वतःशी फक्त इतकेच ठरवायचे आहे की, हा माझ्या आयुष्यातला पहिला दिवस आहे. माझ्या कुटुंबियांकडे पाहून मला कौतुक आणि आश्चर्य वाटेल ते माझ्या बरोबर आहेत याचा मला आनंद होईल. आम्ही सर्व एकमेकांच्यात, ज्या बद्दल बोलले खूप गेले पण अनुभवले कमी, अशा त्या प्रेमाची देवघेव करू. ….
…. आणि हा माझा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असला तरी त्याचा मी पूर्ण आनंद घेईन, कारण मूल जसे निरागसपणे प्रत्येक गोष्ट पहिल्यांदाच करताना तिचा आनंद घेते तसा मी जगणार आहे.
आकाशातून देवदूत धनुष्यबाणासह अवतरतील आणि आपल्या शहराचे रक्षण करतील असा विश्वास अजूनही बाळगणाऱ्या अल्मिराने म्हटले
चमत्कारांबद्द्ल आम्हाला काहीतरी सांग…
कॉप्ट उत्तरलाः- पण चमत्कार म्हणजे तरी काय ? त्याची व्याख्या आपण अनेक प्रकारे करू शकतो. निसर्गनियमांच्या पलीकडे जाऊन कार्य करणारा, संकटात ऐनवेळी परिस्थिती सावरणारा, अवांछित पाहुणा (मृत्यू) समोर उभा ठाकल्यावर शेवटच्या क्षणी त्याला प्रतिबंध करणारा….या सगळ्या व्याख्या खऱ्या आहेत पण चमत्कार या सगळ्याच्या पलीकडचा आहे. तो अचानक आपले ह्रदय प्रेमाने भरून-भारून टाकतो. असे जेव्हा घडते, त्यावेळी ईश्वराने आपल्यावर केलेल्या कृपेबद्दल आपण कृतज्ञ होतो.
हे ईश्वरा, आम्हाला आमचा हा दैनंदिन चमत्कार नित्य अनुभवू दे !
सौंदर्य, ऐट, भीती, काळजी, चमत्कार, शारीरि आणि अशारीरि प्रेम अशा अनेक विषयांवर बोलणारा कॉप्ट “तुझे ठीक आहे. तुला असे सुंदर सुंदर बोलण्याचे शिक्षण मिळाले आहे पण आम्हाला कुटुंब चालवण्यासाठी गुरे राखावी लागतात…” असे थेट विचारणाऱ्या गुराख्यालाही आपल्या सुंदर भाषेत उत्तर देतो.
युद्धभूमीवर अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण आपल्याला आठवल्या शिवाय रहात नाही. पण कॉप्ट सामान्य माणसाच्या आयुष्यातली सुंदरता दाखवून देतो हा फरक आहे.
विनोबा भाव्यांचे विचार संकलित केलेल्या “निरोप्या” या पुस्तकाची आठवण करून देणारे हे पुस्तक. सामान्यांनी विचारलेले थेट प्रश्न आणि त्यांची नेमकी पण सह्रदयतेने दिलेली उत्तरे ही या पुस्तकाची शैली देखील अगदी तशीच.
जीवन काय आहे याचा शोध घेण्याची इच्छा माणसाला भयानक संकटाच्या क्षणीच होते का ? शब्द (कितीही सुंदर असले तरी) जीवनाचा वेध घेऊ शकतात का ? अटळ क्षणाला निर्लेप वृत्तीने सामोरे जाण्याचे धैर्य तत्वज्ञानामुळे मनात निर्माण होऊ शकते का ? या प्रश्नांची उत्तरे कदाचित कोणालाच माहीत नसतील. पण या सगळ्यांचा विचार वाचकाच्या मनात निर्माण करण्याचे श्रेय “अॅक्रामधे सापडलेले हस्तलिखित” या पुस्तकाला जाते.
वृत्तीतला प्रामाणिकपणा, विचारातले धैर्य, सौंदर्य आणि भाषेतली प्रासादिकता यांचा संगम म्हणजे “अॅक्रामधे सापडलेले हस्तलिखित “.